आचारसंहिते मुळे ऐन दिवाळीत लाडकी बहीण योजनेला ब्रेक.

24 प्राईम न्यूज 20 Oct 2024.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावा घेऊन त्या बंद करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व प्रशासकीय विभागांना दिल्या आहेत.
महायुती सरकारने महिलावर्गाला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै २०२४ पासून सुरू केली. राज्यभरातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ ऑक्टोबरपर्यंतअर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती, तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात १५०० रुपये महिना याप्रमाणे आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा केले आहेत, मात्र आता राज्यात निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या सरत्या काळात प्रलोभने दाखवणाऱ्या योजनांवर निवडणूक आयोगाने निर्बंध आणले आहेत. या काळात कोणत्याही योजनांचे पैसे खात्यात जमा केले जाणार नाहीत. तसेच आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना तातडीने बंद कराव्यात, अशा सूचना निडणुक आयोगाने दिलेल्या आहेत.