राजीनामा द्या अन्यथा तुमचा बाबा सिद्दिकी करू मुख्यमंत्री योगींना धमकी.

24 प्राईम न्यूज 4 Nov 2024
उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्याने राजकीय
वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. १० दिवसांत राजीनामा दिला नाहीतर त्यांची बाबा सिद्दिकी यांच्यासारखी हत्या करू असा
धमकीवजा इशारा मेसेजमध्ये देण्यात आला आहे.
याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध
धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या
गुन्ह्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि
एटीएसने स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असून गेल्या काही वर्षांत त्यांना अनेकदा काही समाजकंटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना केंद्र सरकारकडून विशेष सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात सर्वसामान्य नागरिकांसाठी एक हेल्पलाईन सेवा देणारा मोबाईल क्रमांक आहे.
या हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त होतात. शनिवारी सायंकाळी सहा वाजता या हेल्पलाईन मोबाईल क्रमांकावर एक मेसेज आला होता. त्यात अज्ञात व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांना उद्देशून १० दिवसांत राजीनामा दिला नाहीतर त्यांची बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे हत्या करू, अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर ही माहिती संबंधित पोलिसांकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत वरळी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या आरोपीचा गुन्हे शाखा आणि एटीएसकडून शोध सुरू आहे.