मंत्रिमंडळातील एक रिक्त जागा जयंत पाटलांसाठी?

24 प्राईम न्यूज 17 Dec 2024
महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी एका दिवसांपूर्वी नागपूरात संपन्न झाला. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह ३३ कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री असे एकूण ४२ मंत्री नव्या सरकारमध्ये असतील. मात्र ४३ जागा भरण्याची संधी असताना एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील प्रवेश करण्याची शक्यता आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. त्यामुळे ती एक रिक्त जागा जयंत पाटील यांच्यासाठीच असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीदरम्यान झालेल्या विशेष अधिवेशनात भाजप, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांना महायुतीत येण्याची ऑफर देण्यात आली होती. त्याचवेळी योग्य वेळी निर्णय घेऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. सध्याच्या मंत्रिमंडळात सांगलीमधील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही जागा सांगलीच्या जयंत पाटील यांच्यासाठीच असल्याचे बोलले जात आहे.
