आता पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी बंद.. -नापास विद्यार्थी त्याच वर्गात बसणार…

24 प्राईम न्यूज 24 Dec 2024. -केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो-डिटेंशन पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात न ढकलता त्याच वर्गात बसावे लागणार आहे. नव्या अधिसूचनेनुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना २ महिन्यात फेरपरीक्षेची संधी मिळेल, परंतु हे विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. ते ज्या इयत्तेत शिकत होते त्याच इयत्तेचा अभ्यासक्रम त्यांना पुन्हा वर्षभर शिकावा लागेल, परंतु आठवीपर्यंतच्या अशा विद्यार्थ्यांना शाळेतून काढले जाणार नाही,अशी तरतूदही केंद्र सरकारने केलीकेंद्र सरकारच्या नव्या धोरणाचा परिणाम केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सैनिक शाळांसह ३ हजारांहून अधिक शाळांवर होणार आहे. २०१९ मध्ये शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) सुधारणा केल्यानंतर देशातील १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांनी (दिल्ली आणि पुद्दुचेरी) आधीच नो-डिटेंशन धोरण रद्द केले आहे. शालेय शिक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्ये यासंदर्भात स्वतःहून निर्णय घेऊ शकतात, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.