“इस्लामपुरा भागात रस्त्याच्या कामात पाण्याची पाइपलाइन फुटली; दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका”

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर: शहरातील इस्लामपुरा भागात रस्त्याचे काम सुरू असताना पाण्याची पाइपलाइन फुटल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुलांसह अनेकजण आजारी पडत आहेत.
१३ तारखेपासून या भागातील पाण्याची पाइपलाइन फुटल्याने नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे. नागरिकांनी या समस्येबाबत नगरपरिषद आणि ठेकेदार यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. परंतु, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
या समस्येचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, दुरुस्ती लवकर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी अस्लम काझी, शकील खाटीक, ईकबाल ड्रायव्हर, छोटू मिस्तरी, सादिक शेख, हारून मलिक आणि अन्य नागरिक उपस्थित होते.