अमळनेरमध्ये ८ व ९ फेब्रुवारीला जळगाव ग्रंथोत्सवाचे भव्य आयोजन…

0

आबिद शेख/ अमळनेर. -महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व अमळनेर येथील पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘जळगाव ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य ग्रंथोत्सव टाऊन हॉलच्या पटांगणावर होणार असून, सर्वांसाठी मोफत प्रवेश खुला आहे.

ग्रंथदिंडी व उद्घाटन सोहळा

शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या शुभआशीर्वादाने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते दिंडी पूजन पार पडेल. या वेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपशिक्षणाधिकारी एफ. ए. पठान आणि गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील उपस्थित राहणार आहेत.

यानंतर सकाळी ११ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे असतील. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ आणि जळगाव जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर हेही उपस्थित राहणार आहेत.

सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

पहिल्या दिवशी दुपारी ३ वाजता डॉ. एस. के. पाटील (मालेगाव दाभाडी) यांचे ‘अहिराणी वैभव’ या विषयावर प्रबोधनात्मक प्रवचन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मयूर देशमुख (नाशिक) आणि सहकारी ‘महाराष्ट्रातील थोर संतांच्या जीवनावर आधारित संगीतमय भारुड’ सादर करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी हास्यगजर आणि व्याख्याने

रविवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रा. महेंद्र गणपुले (नारायणगाव, पुणे) यांचा ‘हास्यनगरी’ हा विनोदी कार्यक्रम रंगणार आहे. दुपारी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने ग्रंथालयाची वाटचाल’ या विषयावर जळगाव महाविद्यालयाचे ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी व्याख्यान देणार आहेत. त्यानंतर आदिवासी विकास आयुक्तालयाचे सहआयुक्त कपिल पवार यांचे व्याख्यान आणि साहित्य व ग्रंथालय क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या ग्रंथपालांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सर्व वाचक प्रेमींसाठी पर्वणी

या ग्रंथोत्सवात ग्रंथ विक्री व प्रदर्शनाचे अनेक स्टॉल्स असणार आहेत. त्यामुळे वाचक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, जिल्हा ग्रंथालय संघ, अमळनेर तालुका ग्रंथालय संघ आणि आयोजकांनी सर्व वाचकप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!