विशालवरील हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल, एक जेरबंद..

आबिद शेख/अमळनेर. एमपीडीएमधून सुटून आलेल्या विशाल दशरथ चौधरी याच्यावर बाजार समिती आवारात झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
विशालने दिलेल्या जबाबानुसार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास तो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उभा असताना विजय सुरेश शिंगाणे, प्रीतम हिरालाल शिंगाणे, दीपक हिरालाल शिंगाणे, दीपक शांताराम ढोके, गणेश बापू शिंगाणे आणि दिनेश गायब शिंगाणे (सर्व रा. भोईवाडा, अमळनेर) यांनी त्याच्याशी वाद घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हल्लेखोरांनी धारदार शस्त्र, चाकू, लोखंडी रॉड आणि लाठ्यांचा वापर करून विशालच्या डोक्यावर आणि पायांवर गंभीर वार केले. घटनास्थळी नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. जखमी विशालला उपचारासाठी धुळ्यात हलवण्यात आले. त्याने दिलेल्या जबाबावरून अमळनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १०९, १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५, ३५१(२), ३५२, १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.