मनीयार बिरादरी व एकता संघटनेचा स्तुत्य उपक्रम.. -खान अब्दुल गफार खान जयंतीनिमित्त शिरसोली उर्दू शाळेत मार्गदर्शन व मिठाई वाटप…

आबिद शेख/अमळनेर
महान स्वातंत्र्यसेनानी आणि अहिंसेचे प्रणेते खान अब्दुल गफार खान यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी आणि एकता संघटनेच्या वतीने शिरसोली येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खान अब्दुल गफार खान यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन मिठाई वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात फारुक शेख यांनी ‘सरहद गांधी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांच्या अहिंसक लढ्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी 1923 साली खुदाई खिदमतगार चळवळ सुरू करून ब्रिटिश सत्तेविरोधात अहिंसक प्रतिकार केला. भारताच्या फाळणीनंतरही त्यांची चळवळ सुरू राहिली, मात्र पाकिस्तान सरकारकडून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दिल्लीमध्ये 2011 साली फैसल खान यांनी खुदाई खिदमतगार चळवळीचे पुनरुज्जीवन केले, ज्याचा उद्देश सांप्रदायिक सौहार्द आणि सामाजिक सेवा होता.
कार्यक्रमात बिरादरीचे उपाध्यक्ष सैयद चांद, खजिनदार ताहेर शेख, सहसचिव रऊफ टेलर, एकता संघटनेचे मुजाहिद खान, इब्राहिम शेख यांची उपस्थिती होती. शाळेतील शिक्षक अमिन शहा, अब्दुल रऊफ, जोहरा पटेल, मोहम्मद उमरखान, नाज परवीन, रोशन आरा, रुखसार बी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.