शिवतीर्थ मैदानावर पहिली पत्रकार प्रीमियर लीग: १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान रंगणार क्रिकेट महाकुंभ…

आबिद शेख/अमळनेर. -जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणत त्यांच्या मनोरंजनासाठी व सौहार्द वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने राज्यातील पहिली “पत्रकार प्रीमियर लीग” स्पर्धा जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत शिवतीर्थ मैदानावर ही रोमांचक क्रिकेट स्पर्धा रंगणार असून, जिल्ह्यातील २० पत्रकार संघांसह शासकीय विभागांचे ४ संघ सहभागी होणार आहेत.
पत्रकार प्रीमियर लीग: पत्रकारांसाठी विशेष उपक्रम
पत्रकार नेहमीच समाजासाठी अहोरात्र कार्यरत असतात. मात्र, त्यांच्या मनोरंजनासाठी फारसे उपक्रम आयोजित केले जात नाहीत. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी वाल्मिक जोशी, किशोर पाटील, चेतन वाणी, वसीम खान, सचिन गोसावी, जकी अहमद आदी आयोजकांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेतील वैशिष्ट्ये:
- २४ संघांचा सहभाग: जिल्ह्यातील १४ तालुक्यांचे संघ, जळगाव शहरातील ५ संघ, तसेच संपादक संघ पत्रकार गटातून स्पर्धेत सहभागी होतील. तसेच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व पोलीस प्रशासन असे ४ शासकीय संघ देखील मैदानावर उतरणार आहेत.
- ३ दिवसांची रोमांचक स्पर्धा: प्रत्येक सामना ८ षटकांचा असेल आणि टेनिस बॉलवर खेळला जाईल.
- मोफत सहभाग: खेळाडूंकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- भव्य बक्षीस वितरण: स्पर्धेच्या विजेत्यांना ट्रॉफीसह हजारो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
पत्रकारांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घ्यावा – आयोजकांचे आवाहन
पत्रकारांसाठी, पत्रकारांकडून असे या स्पर्धेचे स्वरूप असून, तालुकास्तरावरून संघांची नावे मागवण्यात आली आहेत. प्रत्येक संघात १३ खेळाडू असतील. मैत्रीपूर्ण वातावरण आणि सुसंवाद वाढावा, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात आहे. सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पहिल्या पर्वाला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.