अमळनेर बाजार समितीत प्रथमच भव्य शेतकरी सन्मान सोहळा संपन्न..

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सभासद शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या सन्मानाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच बाजार समितीच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री आ. अनिल भाईदास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती सतत कार्यरत असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली. यावेळी आ. अनिल पाटील, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सभापती अशोक पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, संचालक मंडळाने बाजार समितीला कर्जमुक्त करून कोट्यवधी रुपयांची शिलकी निर्माण केली आहे. पुढील काळात कोणताही आर्थिक बोजा न वाढवता व्यापाऱ्यांसाठी शेकडो नवीन गाळे उभारले जातील.
शेतकऱ्यांना सन्मानित करण्यासाठी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कृषिरत्न पुरस्कार’, तर शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘गावरान जागल्या सेना पुरस्कार’ देण्यात आला. याशिवाय, उत्कृष्ट खरेदीदार, आडतदार, हमाल, गुमास्ता व कृषी उद्योजक यांनाही गौरविण्यात आले.
तसेच, आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार, आदर्श विकास सोसायटी पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक व गट सचिव पुरस्कार प्रदान करण्यात आले. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले रोहित भगवान कंखरे व शुभांगी भगवान कंखरे या भावंडांचा ‘यशोदीप पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
शिवजयंती निमित्त आयोजित शिवव्याख्यानात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी शिवरायांचे जाती-धर्मापलीकडील कार्य व त्यांच्या प्रशासनातील न्यायप्रिय विचारांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमात व्यापारी भवन व नव्याने उभारलेल्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन तसेच शेतकरी प्रेरणा स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. बाजार समिती सचिव डॉ. उन्मेष राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले, तर उपसभापती सुरेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी अनेक मान्यवर, संचालक मंडळाचे सदस्य,पत्रकार, व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.