अमळनेरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी, विविध ठिकाणी शिवरायांना अभिवादन

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवरायांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने झाली. यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक बारबोले, पोलीस निरीक्षक विकास देवरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, जळगाव जनता बँकेचे मॅनेजर महेश गर्गे, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, घनश्याम पाटील, राजेंद्र यादव, निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर नाट्यगृहातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचेही सामूहिक पूजन करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी शिवरायांना मानवंदना दिली. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्साहात साजरी केली.