मांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता बडगुजर यांची बिनविरोध निवड

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली असून, एकमेव अर्ज आल्याने कविता दीपक बडगुजर यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गौरव यशवंत शिरसाठ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडली.
मागील सरपंचांनी आपसात ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, या पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने कोणतीही स्पर्धा न होता कविता बडगुजर यांची निवड निश्चित झाली. निवड घोषित होताच गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
या निवडीनंतर गावातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी सरपंच किरण जैन, विद्याबाई पाटील, पंचायत समितीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
नवनिर्वाचित सरपंच कविता बडगुजर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला. “रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देत गावाचा विकास साधला जाईल,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या निवडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण असून पुढील काळात विकासकामांवर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.