पालिकेतील लुटारू ठेकेदारांना ब्रेक द्या! -राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भूषण भदाणे यांचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – नगरपरिषदेतील काही मोजक्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांची लूट केली असून, त्यांनाच पुन्हा ठेके मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अशा लुटारू ठेकेदारांना थांबवले नाही तर संपूर्ण कारस्थाने उघड केली जातील, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी दिला आहे.
नगरपरिषदेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज सुरू आहे. सर्व निर्णय अधिकारी घेत असल्याने, टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता वाढली आहे. गेल्या आठ वर्षांत काही ठरावीक ठेकेदार पालिकेत प्रस्थापित झाले असून, त्यांनी अवाजवी बिले काढून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदारांची साखळी तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप भदाणे यांनी केला आहे.
या प्रकाराची माहिती स्थानिक आमदारांनाही देण्यात आली असून, पालिकेतील अपारदर्शक कारभार तातडीने थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जर पुन्हा त्या ठेकेदारांनाच संधी दिली गेली, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा भूषण भदाणे यांनी दिला आहे.