रोटरी क्लब अमळनेर तर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविला..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर, दि. 4 मार्च 2025 – रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने आज कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बैलगाडी, ट्रॅक्टर, मिनी ट्रक, थ्री व्हीलर आणि सायकलवर परावर्तक (रिफ्लेक्टर) टेप लावण्यात आले.
रिफ्लेक्टर टेपसह, रोटरी इंटरनॅशनल व्हील हा लोगो देखील रेडियममध्ये तयार करून लावण्यात आला, जेणेकरून रात्रीच्या वेळी ही वाहने लांबून स्पष्ट दिसावीत आणि संभाव्य अपघात टाळता येतील. अपुऱ्या प्रकाशामुळे किंवा वाहनांवर रिफ्लेक्टर टेप नसल्यामुळे अनेकदा अपघात होतात. ही स्थिती लक्षात घेऊन, निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आणि रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून ट्रॅक्टर आणि लहान मालवाहू वाहनांना सुरक्षित प्रवासासाठी मदत मिळणार आहे. रोटरी क्लब अमळनेरने घेतलेल्या या पुढाकारामुळे शेतकरी बांधवांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होईल आणि संभाव्य अपघात टाळता येतील.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रोजेक्ट चेअरमन रो. अजय केले, रो. रौनक संकलेचा, रो. विवेक देशमुख, रो. आशिष चौधरी, रो. भारत बोथरा, रो. वृषभ पारख, रो. योगेश येवले आणि प्रेसिडेंट रो. ताहा बुकवाला यांनी विशेष मेहनत घेतली.
रोटरी क्लब अमळनेरच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.