बहुजन समाजाचा मोर्चा स्थगित, कोल्हापूर पोलिसांचे तक्रार समाविष्ट करण्याचे आश्वासन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर— छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूर येथे दाखल गुन्ह्यात अमळनेर बहुजन समाजाची तक्रार समाविष्ट केली जाईल, अशी ग्वाही कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. त्यांच्या या आश्वासनानंतर ९ मार्च रोजी निघणारा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.
यापूर्वी, कोरटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमळनेर तालुक्यातील बहुजन समाजाने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याने समाज आक्रमक झाला. यावेळी डिवायएसपी विनायक कोते आणि प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी समाजाच्या प्रतिनिधींना जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेण्यास सांगितले.
शनिवारी झालेल्या या बैठकीत, रेड्डी यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पंडित यांनी अमळनेर येथील तक्रार कोल्हापूर गुन्ह्यात समाविष्ट केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे बहुजन समाजाने ९ मार्च रोजी होणारा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या शिष्टमंडळात प्रशांत निकम, अॅड. दिनेश पाटील, मनोहर निकम, महेश पाटील, कैलास पाटील, दीपक काटे, दयाराम पाटील यांचा समावेश होता.