इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्याने परत केली हरवलेली पिशवी; प्रामाणिकपणाच्या कौतुकार्थ सत्कार..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – सध्या मोबाईल आणि पैशांची आकर्षण असलेल्या युगात मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता ८ वीतील विद्यार्थी वेदांत विशाल पाटील याने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. त्याने रस्त्यात सापडलेली कपडे, पैसे, मोबाईल आणि महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी मूळ मालकाला परत केली, त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
वेदांत हा ७ मार्च रोजी आपल्या भावासह शिरूड रस्त्याने शेतात जात असताना त्याला पिशवी सापडली. त्यात पैसे असलेली पर्स आणि दोन मोबाईल होते. वेदांतने प्रामाणिकपणाने त्या वस्तू आपल्या वडिलांना दिल्या व नंतर वर्गशिक्षक संजय पाटील यांना कळवले. दरम्यान, त्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरून इंधवे (ता. पारोळा) येथील पोलीस पाटील शीतल ज्ञानेश्वर पाटील यांचा त्यावर हक्क असल्याचे समजले.
विशेष म्हणजे त्या मोबाईलमध्ये शीतल पाटील यांच्या पतीच्या आर्मीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे तसेच त्यांच्या मुलीच्या नीट परीक्षेचा अभ्यासक्रम होता. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब व्यथित झाले होते. वेदांतच्या प्रामाणिकपणामुळे हे सर्व दस्तऐवज सुरक्षित मिळाल्याने शीतल पाटील यांनी आपल्या कुटुंबासह वेदांतचा सत्कार करत त्याला अकराशे रुपयांचे बक्षीस दिले.
या वेळी मंगरूळ पोलीस पाटील भागवत पाटील, जिराळी पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, वर्गशिक्षक संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सध्याच्या काळात मुलांमध्ये मोबाईल आणि पैशांची हाव वाढत असताना वेदांतने दाखवलेला प्रामाणिकपणा हा प्रेरणादायी आहे.”