ग्रामविकास आणि महिलासशक्तीकरणाचा अनोखा संगम: लोणखुर्द येथे महिला सभेचे आयोजन..

आबिद शेख/अमळनेर
ग्रामविकासाच्या माध्यमातून गावाच्या किर्तीचा कळस बनवा, असे आवाहन माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त लोणखुर्द (ता. अमळनेर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित महिला सभेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
महिला सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. डॉ. शशिकांत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक समाधान धनगर, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद विभागीय अध्यक्षा सुषमा देसले उपस्थित होते. मार्गदर्शनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक्षा पाटील आणि समुपदेशिका वैशाली ठाकरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच आरोग्य आणि स्वच्छतादूत आशाताई अश्विनी भील यांचा सन्मान करण्यात आला. किशोरवयीन मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
प्रमुख अतिथी सुषमा देसले यांनी महिलांच्या आरोग्यावरील या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. प्रतीक्षा पाटील यांनी महिलांच्या आरोग्य आणि कर्करोगासंबंधी मार्गदर्शन केले, तर गटप्रवर्तक वैशाली ठाकरे यांनी किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन केले.
अध्यक्षीय भाषणात सरपंच प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांनी महिला सक्षमीकरणासाठी लोणखुर्द ग्रामपंचायत नवोपक्रम राबविण्यास तत्पर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमानी पाटील यांनी केले, तर आभार भूमिका पाटील यांनी मानले. गावातील महिलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाला प्रतिसाद दिला.