पीओपी मूर्ती बंदीबाबत पुनर्विचार करावा. – आमदार अनिल पाटील यांची सभागृहात मागणी.

आबिद शेख/अमळनेर
महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती बनवण्यावर घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज सभागृहात केली.
या संदर्भात त्यांच्या मतदारसंघातील मूर्तिकार संघटनेने काही दिवसांपूर्वी त्यांना निवेदन सादर करून विनंती केली होती. मूर्तिकारांच्या मागणीकडे सरकारने सकारात्मक विचार करून योग्य तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
“मूर्तिकार हे आपल्या परंपरेशी जोडलेले असून त्यांचा रोजगारही या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत सरकारने पुनर्विचार करावा,” असेही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या मागणीमुळे राज्य सरकार या विषयावर कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.