वक्फ सुधारणा विधेयकविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकता संघटनेचे निदर्शने..

24 प्राईम न्यूज 18 मार्च 2025

जळगाव – केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) विधेयकाविरोधात एकता संघटनेच्या नेतृत्वाखाली १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. या वेळी संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी निदर्शकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, हा कायदा वक्फ मालमत्तांच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा करेल आणि मुस्लिम समाजावर थेट हल्ला आहे.
विधेयकाविरोधात कडक नाराजी
शेख यांनी नमूद केले की, संसदीय संयुक्त समितीकडे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ३.६ कोटींपेक्षा अधिक ईमेलद्वारे आक्षेप नोंदवले होते, परंतु त्यांची दखल घेतली नाही. तसेच, विरोधी पक्षांनी सुचवलेल्या ४४ सुधारणा समितीने फेटाळल्या. त्यामुळे मुस्लिम समाजाला या विधेयकाबाबत गंभीर आक्षेप असून, सरकारने लोकशाही प्रक्रियेऐवजी हुकूमशाही दृष्टिकोन स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.
‘विधेयक त्वरित मागे घ्या’ – निदर्शकांचा एल्गार
यावेळी निदर्शकांनी “वापस लो : वापस लो, वक्फ बिल वापस लो!” आणि “रद्द करा : रद्द करा, वक्फ संशोधन बिल रद्द करा!” अशा घोषणा देत विरोध दर्शवला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
महिला प्रतिनिधी निगार सुलताना, मुफ्ती अतिक, मुफ्ती खालिद, मौलाना रहीम पटेल, फारूक शेख आणि बाबा देशमुख यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. या निवेदनात राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा अध्यक्ष, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे विधेयकाला विरोध नोंदवत ते संसदेत मंजूर करू नये, अशी मागणी करण्यात आली.
निदर्शनात सहभागी मान्यवर
या आंदोलनात मुफ्ती अतिकउर रहमान, मुफ्ती खालीद, मौलाना रहीम पटेल, फारूक शेख, मजहर खान, अनिस शहा, मतीन पटेल, युसुफ खान, अमजद खान, हकीम चौधरी, शब्बीर शेख, अजगर खान, तसेच विविध भागांतून आलेले सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.