सिंधी कॉलनीतील रहिवाशांची मालमत्ता कराबाबत मागणी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर सिंधी कॉलनीतील रहिवाशांनी मालमत्ता करासंदर्भात स्पष्टता मिळावी, यासाठी अमळनेर नगर परिषदेशी लेखी स्वरूपात मागणी केली आहे. सिंधी जनरल पंचायतने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागील 8 ते 10 वर्षांतील कराचे तपशील तसेच वाढीचे कारण व प्रमाण याबाबत सविस्तर माहिती देण्याची विनंती केली आहे.
निवेदनानुसार, रहिवाशांना खालील मुद्द्यांवर माहिती हवी आहे:
- मागील 8-10 वर्षांतील मालमत्ता कर दर.
- कर वाढीची वर्षनिहाय माहिती आणि वाढीचे प्रमाण.
- कौलघर, कच्च्या व कॉक्रिटच्या घरांसाठी कर रचनेचे सविस्तर विवरण.
सिंधी कॉलनीतील नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, योग्य आणि न्याय्य कर भरण्यास ते तयार आहेत. मात्र, जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मालमत्ता कर भरणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
नगर परिषद प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन नागरिकांना आवश्यक ती माहिती पुरवावी, अशी मागणी होत आहे.