महाराष्ट्रातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार – शिक्षणमंत्री भुसे

24 प्राईम न्यूज 21 मार्च 2025. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये लवकरच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम राबवला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी परिषदेमध्ये दिली.
राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी आणि शिक्षण पद्धती अधिक प्रभावी व्हावी, यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत प्रश्न विचारला असता, शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने अभ्यासक्रमाच्या आराखड्याला मान्यता दिली असल्याचे भुसे यांनी सांगितले.
नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांमध्ये सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश केला जाणार आहे. तसेच, या पाठ्यपुस्तकांचे मराठी भाषांतर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी सुरू असून, या शैक्षणिक सत्राची सुरुवात १ एप्रिल २०२५ पासून होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.