अमळनेरात अफवेमुळे तणाव, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथे किरकोळ वादातून अफवा पसरल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच कठोर पावले उचलल्याने शहरात शांतता आहे. हिंदू आणि मुस्लिम सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एका मुलाने ठेवलेल्या स्टेटसवरून किरकोळ वाद निर्माण झाला. यामुळे गैरसमज टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याने अफवा पसरली. आगामी गुढीपाडवा आणि ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर बाहेरून अतिरिक्त पोलिस मागवण्यात आले. पारोळा, धरणगाव, मारवड येथून आलेल्या पोलिसांनी विविध ठिकाणी बंदोबस्त केला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते, परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शहरात पाहणी केली. तसेच, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अफवा आणि गैरसमज टाळा
घटनेबाबत कोणतीही मोठी हिंसक घटना घडलेली नाही, तसेच कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही, असे अमळनेर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेनेही नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यास कठोर कारवाईचा इशारा
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कृत्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा डीवायएसपी विनायक कोते आणि परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिला आहे.