अमळनेर नगरपरिषदेत कर बुडवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा – सहा फ्लॅट सील, २४० नळजोडणी बंद..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर: अमळनेर नगरपरिषदेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर मिळून एकूण ₹१३.७१ कोटी वसूल करायचे आहेत. मात्र, आतापर्यंत ₹१०.२१ कोटींचीच वसुली झाल्याने अद्यापही सुमारे ₹३.५ कोटींची थकबाकी बाकी आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने कठोर पावले उचलत २४० नागरिकांची नळजोडणी बंद केली असून, सहा फ्लॅट सील केले आहेत.

२५ हजार मालमत्ता धारकांवर बकायाचा बोजा
शहरात २५,००० मालमत्ता धारक आणि १७,००० नळ कनेक्शन धारक आहेत. अपेक्षित मालमत्ता कर ₹९.०४ कोटी असून त्यातील ७१.४४% वसूल झाला आहे. तर पाणीपट्टीसाठी ₹४.६६ कोटी अपेक्षित होते, त्यापैकी ८०.४७% वसुली झाली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्याने प्रशासनाने ही कठोर कारवाई सुरू केली आहे.

शैक्षणिक संस्था आणि मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची टांगती तलवार
भरारी पथकाने १२० पाण्याच्या मोटारी जप्त केल्या असून, शैक्षणिक संस्था, चेअरमन वर्किंग वूमन हॉस्टेलसह चार मोठ्या थकबाकीदारांना जप्तीच्या अंतिम नोटिसा पाठवल्या आहेत. तसेच अन्य थकबाकीदारांच्या मालमत्तांवर नगरपरिषदेचे नाव लावले जाणार आहे.

प्रभागात थकबाकीदारांची नावे डिजिटल बॅनरद्वारे जाहीर होणार
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी नागरिकांना त्वरित थकीत कर भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा, थकबाकीदारांची नावे त्यांच्या प्रभागात डिजिटल बॅनरद्वारे जाहीर केली जातील, तसेच त्या बॅनरचा खर्चही संबंधितांकडून वसूल केला जाईल. कर भरण्यासाठी सुटीच्या दिवशीही वसुली विभाग सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


ही कारवाई मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वारंट अधिकारी संदीप जगन्नाथ पाटील, सुनिल शिवाजी पाटील, अजित लांडे, संतोष बि-हाडे, किरण कंडारे, प्रविणकुमार बैसाणे, डीगंबर वाघ, लौकीक समशेर, उपमुख्याधिकारी आर.डी. चव्हाण, कर निरीक्षक आर.डी. लांबोळे आणि अधिनस्त कर्मचारी राधा नेतले, निखिल संदानशिव, जगदीश बि-हाडे, बाळकृष्ण जाधव, अखिल काझी यांनी ही कारवाई यशस्वीपणे राबवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!