थकबाकीपोटी हॉटेल सील; पालिकेची कठोर कारवाई..

आबिद शेख/अमळनेर
मालमत्ता कर थकबाकी न भरल्यामुळे अमळनेर पालिकेने कठोर कारवाई करत धुळे रोडवरील हॉटेल साईप्रसाद सील केले. तसेच, देवाज हॉटेल आणि योगेश हॉटेल यांना थकबाकी भरण्यासाठी एक दिवसाची अंतिम संधी देण्यात आली आहे.
पालिकेकडे मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या स्वरूपात तब्बल ३ कोटी रुपयांची थकबाकी असून, अनेक व्यापारी आणि नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. वारंवार नोटिसा, तोंडी सूचना तसेच वृत्तपत्रांमधून नाव प्रसिद्ध करूनही कर भरण्यात आले नाही. त्यामुळे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशानुसार थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे.
उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, रवींद्र लांबोळे, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, जगदीश चौधरी, रोहित लांबोळे, इथिक संदानशिव, यश लोहरे आणि जगदीश बिऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हॉटेल साईप्रसादकडे २.८० लाख रुपयांची थकबाकी असून, देवाज आणि योगेश हॉटेल्सकडेही मोठी रक्कम बाकी आहे. या दोन्ही हॉटेल चालकांनी एक दिवसाची मुदत मागितली असून, तो कालावधी संपल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.