घरबसल्या मालमत्तेची नोंदणी शक्य; १ मेपासून ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना सुरू

24 प्राईम न्यूज 4 April 2025
घर खरेदी-विक्रीच्या नोंदणी प्रक्रियेत लागणारा वेळ, सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आणि दलालांचा अडथळा याला आता पूर्णविराम मिळणार आहे. राज्य सरकारने ‘एक राज्य, एक नोंदणी’ (One State, One Registration) ही अभिनव योजना जाहीर केली असून, येत्या १ मेपासून ही ऑनलाईन पद्धत अमलात येणार आहे.
राज्यातील कुठल्याही जिल्ह्यातील मालमत्तेची नोंदणी ही कुठूनही—घराबसल्या—करता येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
बावनकुळे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डिजीटल इंडिया’ व ‘डिजीटल महाराष्ट्र’ या संकल्पांवर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून महसूल विभागाने एक पारदर्शक, जलद व नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. ‘एक राज्य, एक नोंदणी’ या योजनेद्वारे आता पुण्यात बसून नागपूरमधील घराची, मुंबईतून पुण्यातील घराची ऑनलाईन नोंदणी करता येईल.”
महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत मुद्रांक निरीक्षक व महानिरीक्षक यांनी ही प्रणाली विकसित केली असून, नागरिकांना सुलभ सेवा देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
या योजनेचे काही महत्त्वाचे फायदे :
- कुठल्याही जिल्ह्यातील घराची नोंदणी घरबसल्या करता येणार
- दलालांचा अडथळा टळणार, प्रक्रियेत पारदर्शकता
- वेळ व खर्चात मोठी बचत
- महसूल कार्यालयांच्या गर्दीचा त्रास टळणार
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासादायक सुविधा ठरणार आहे.