१० लाख न भरल्यामुळे गर्भवतीला रुग्णालयात नाकारलं, नंतर मृत्यू; मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप, चौकशीचे आदेश

0

24 प्राईम न्यूज 4 April 2025



पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी १० लाख रुपयांची आगाऊ मागणी केल्याचा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. पैसे न दिल्याने संबंधित महिलेला रुग्णालयाने प्रवेश नाकारला आणि तिचा अखेर मृत्यू झाला. या प्रकारामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

मृत महिला तनिषा भिसे (वय २८) या ७ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्या आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता त्यांना रक्तस्त्राव होऊ लागल्याने तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालय प्रशासनाने तात्काळ उपचार देण्याऐवजी १० लाख रुपये आगाऊ भरावे लागतील, अशी अट घातली.

आर्थिक अडचण असूनही तातडीने मदतीचा प्रयत्न

भिसे कुटुंबीयांनी सुरुवातीला ३ लाख रुपये तात्काळ भरण्याची तयारी दर्शवली आणि उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल, असं सांगितलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडूनही रुग्णालय प्रशासनाशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने कोणत्याही प्रकारची लवचिकता न दाखवता तनिषा यांना उपचार देण्यास नकार दिला.

दुसऱ्या रुग्णालयात हलवणं आणि दुर्दैवी मृत्यू

शेवटी भिसे कुटुंबीयांनी तनिषा यांना ससून रुग्णालयात दाखल केलं. तिथे आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने त्यांना सायंकाळी वाकड येथील सूर्या रुग्णालयात हलवण्यात आलं. ३० मार्च रोजी तिथे सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने तनिषा यांची प्रकृती बिघडली.

सुर्या रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याने त्यांना लगेच बाणेर येथील मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं आणि ३१ मार्च रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णालय प्रशासनावर टीका, पोलिसांत तक्रार

ही संपूर्ण घटना उघडकीस आल्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मनमानीचा आणि अडमुठेपणाचा पर्दाफाश केला. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत पुणे पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दाखल केली आहे.

“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरजूंवर उपचार करण्याऐवजी पैसा महत्त्वाचा मानला. जर वेळीच उपचार मिळाले असते, तर तनिषा आज जिवंत असती,” असं गोरखे यांनी म्हटलं आहे.

सरकार आणि महिला आयोगाची दखल

या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच राज्य महिला आयोगानेही या प्रकरणात हस्तक्षेप करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे.

रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, “या प्रकरणात माध्यमांतून समोर आलेली माहिती अपुरी आहे. रुग्णालयाच्या अंतर्गत चौकशी समितीमार्फत याचा सविस्तर तपास सुरू असून सत्य परिस्थिती राज्य सरकारसमोर मांडण्यात येईल.”

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनीही याबाबत तपास सुरू असल्याचं सांगत भिसे कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात असल्याची माहिती दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!