उम्मीद (वक्फ संशोधन) कायद्याच्या विरोधात जळगावमध्ये मुस्लिम महिलांचा रस्त्यावर उतरून तीव्र निषेध..

24 प्राईम न्यूज 5 April 2025
जळगाव – केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा करत आणलेला ‘उम्मीद’ कायदा विरोधात जळगाव येथील मुस्लिम मणियार बिरादरीच्या महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. घोषणा देत त्यांनी ‘वक्फ अमेंडमेंट बिल पीछे लो’, ‘वुई रिजेक्ट वक्फ अमेंडमेंट बिल’ अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
महिलांनी सांगितले की, “वक्फ कानून में हुए उम्मीद का हम निषेध करते हैं,” आणि “वक्फ की बजाए उम्मीद ला कर हमें ना-उम्मीद करने वाली सरकार का विरोध करतो.” त्यांनी वक्फ कायदा १९९५ हाच आमचा आधार आहे, तो परत मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा ठाम इशारा दिला.
या वेळी उपस्थित महिलांनी केंद्र सरकारच्या या बिलाच्या समर्थनार्थ असलेल्या राजकीय पक्षांचा – जेडीयू, टीडीपी, एसीपी, भाजप, शिवसेना शिंदे गट, जेडीएस आणि एलजेडी – यांचाही जोरदार निषेध केला. निषेधार्थ महिलांनी ‘उम्मीद’ बिलाचे प्रती फाडून आपला संताप व्यक्त केला.
वक्फ आणि ‘उम्मीद’ यातील सत्य : फारुक शेख यांचे मार्गदर्शन
एकता संघटनेचे प्रमुख आणि जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी महिलांना वक्फ कायदा १९९५ आणि नव्या ‘उम्मीद’ कायद्यातील फरक समजावून सांगितले. त्यांनी भाजप सरकारने मुस्लिम समाज, विशेषतः महिलांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.
आलेमा नाजिया शेख यांनी सरकारचा घेतला समाचार
मणियार मोहल्ल्यातील अरबी मदरशाच्या प्रमुख आलेमा नाजिया शेख यांनी २०१४ पासून आजपर्यंत केंद्रातील मोदी सरकारने मुस्लिम महिलांच्या हितासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे नमूद केले. तीन तलाक, ३७० कलम, सीएए किंवा ‘उम्मीद’ कायदा – कोणत्याही धोरणातून महिलांचे नुकसानच झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.
उल्लेखनीय उपस्थिती
या आंदोलनात आलेमा नाजिया शेख, हाजरा फारुक शेख, हाजरा सलीम शेख, जरीना अब्दुल रऊफ, जुबेदा सय्यद चांद, रुबीना शेख इकबाल, तंजीना शेख, सय्यद खतीजा मुक्तार, मिसबा शेख, नादिया शेख एजाज यांच्यासह अनेक महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच फारुक शेख, एजाज शेख, हसन शेख, अब्दुल रऊफ, मुजाहिद खान यांसारखे पुरुषही या निषेधात सहभागी झाले.