जि. प. प्राथमिक शाळा, जवखेडे येथील चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न…

आबिद शेख/अमळनेर
जवखेडे “अशी पाखरे येती अन् स्मृती ठेऊनी जाती”, अशाच भावनिक वातावरणात जि. प. प्राथमिक शाळा, जवखेडे येथील चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
शैक्षणिक वर्ष संपत आल्याने चौथीचे विद्यार्थी आता पुढील शिक्षणासाठी इतर शाळांकडे वाटचाल करणार आहेत. एकीकडे नवीन शाळेचा उत्साह तर दुसरीकडे आपल्या लाडक्या शाळेपासून, शिक्षकांपासून दूर जाण्याचे दुःख विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक नानासो श्री छगन पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. आपल्या शिक्षकांविषयी आणि शाळेविषयीचे प्रेम त्यांनी शब्दांतून मांडले.
वर्गशिक्षक श्री मुकेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या सुरुवातीच्या आठवणी सांगत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेल्या सकारात्मक बदलांचे कौतुक केले. मुख्याध्यापक श्री पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे, नम्र स्वभावाचे आणि संस्कारांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी शाळेला शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील यांचे चिरंजीव चि. ज्ञानेश छगन पाटील याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
कार्यक्रमानंतर वरणभात, बट्टी, वांग्याची भाजी, जिलेबी असा पारंपरिक व रुचकर भोजन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री छगन पाटील यांनी भूषवले. सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ. सुनिता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती अर्चना बागुल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक श्रीमती रेखा पाटील, श्रीमती सुनिता पाटील, श्रीमती अर्चना बागुल, श्री मुकेश पाटील, श्री माधवराव ठाकरे तसेच युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती अनिता बोरसे यांनी मोलाचे सहकार्य केले.