मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी पूर्ण; निकाल ८ मे रोजी जाहीर.

24 प्राईम न्यूज 20 April 2025
मालेगाव – २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. ८ मे रोजी या खटल्याचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
एनआयए न्यायालयाने खटल्यामध्ये सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब व सादर झालेल्या पुराव्यांची सखोल तपासणी केली. आरोपी व सरकारी वकिलांनी आपले युक्तिवाद मांडल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी वेळ मागितला.
या प्रकरणात काही उच्चपदस्थ व्यक्तींवर आरोप असल्याने ही सुनावणी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत होती. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.
या खटल्याचा निकाल केवळ पीडित कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर देशातील न्यायव्यवस्था व दहशतवादविरोधी धोरणांसाठीही महत्वाचा ठरणार आहे. मालेगाव स्फोटानंतर धार्मिक व सामाजिक तणाव निर्माण झाला होता.
सदर खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली असून, त्यानंतर ही सुनावणी पूर्णत्वास पोहोचली आहे.