“अमळनेरकरांना पाण्यासाठी हैराणी; नगरपरिषदेला श्याम पाटील यांचा थेट इशारा!”

आबिद शेख/अमळनेर
– अमळनेर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ९३% कर वसुली करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आरोग्य समितीचे मा. सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी नगरपरिषदेचे व मुख्याधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, त्यांनी शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मागील ३ महिन्यांपासून अमळनेर शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पूर्वी ४ दिवसांनी मिळणारे पाणी आता १०-१२ दिवसांनी मिळत आहे. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने नागरिकांची पाण्याची गरज वाढली आहे, मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही अनेकांना पैसे मोजावे लागत आहेत.
त्यांनी हेही निदर्शनास आणले की, शहरात चालू असलेली २४x७ पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची कामे आणि भुयारी गटार योजनेमुळे अनेक ठिकाणी पाईपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. काही ठिकाणी चेंबर उघडे असल्यामुळे दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत असूनही नगरपरिषद कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर सामाजिक संघटना व नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल आणि त्यासाठी संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल.