अमळनेरमध्ये आज श्वानांसाठी मोफत रेबीज लसीकरण मोहीम..

आबिद शेख/ अमळनेर
पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधून जनजागृतीसाठी उपक्रम

अमळनेर — पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधून पशु वैद्यकीय दवाखाना, अमळनेर येथे श्वानांसाठी मोफत रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम बुधवार, दिनांक २१ मे २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत राबविण्यात येणार आहे.

पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने नगरपरिषद अमळनेर यांना कळविण्यात आले आहे की, या मोहिमेची योग्य ती प्रसिद्धी शहरात करण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त श्वानांचे लसीकरण होऊन रेबीजच्या संसर्गावर नियंत्रण ठेवता येईल.
या मोहिमेची प्रत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनाही पाठविण्यात आली आहे. नागरिकांनी या उपक्रमात भाग घेऊन आपल्या पाळीव श्वानांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.