अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसाने मका पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील अंतुली येथील शेतकरी शिवाजीराव आनंदराव पाटील यांनी अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या मका पिकाच्या नुकसानीचा अद्याप पंचनामा न केल्याबाबत तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.

शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, दिनांक ४ मे आणि १५ मे २०२५ रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि वादळामुळे त्यांच्या शेतातील मका पीक आडवे पडले आहे. परिणामी कापणीसाठी मजूर मिळत नाहीत, ट्रॅक्टर व अन्य वाहने शेतात जाऊ शकत नाहीत. दाण्याचा रंग काळपट होऊन वजनही कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
श्री. पाटील यांनी धार सजा येथील तलाठी श्रीमती भोसले मॅडम यांना नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधला, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांनी या उदासीनतेविरोधात तहसील कार्यालयात तक्रार केली असून, संबंधित तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सादर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रशासनाने तत्काळ परिस्थितीची दखल घ्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा.