वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अमळनेरात विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यानाचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) – हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८५व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात दिनांक २९ मे रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पाचोरा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. सचिन देवरे सर यांचे व्याख्यानही होणार आहे.
हा कार्यक्रम अमळनेर तालुका राजपूत एकता मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून जि.एस. हायस्कूल, अमळनेर येथील आय.एम.ए. हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे शहरात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढली जात असे. मात्र यावर्षी काश्मीरच्या पहलगाम येथे घडलेल्या घटनेत काही निरपराध भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे, महाराणा प्रताप हे राष्ट्रीय पुरुष असल्याने, जल्लोष टाळून सामाजिक जाणीव ठेवत यंदा विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यान या स्वरूपात जयंती साजरी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व समाजातील हिंदू बांधव व महाराणा प्रताप प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वर्णदीप राजपूत, कार्याध्यक्ष जयविर राजपूत तसेच राजपूत एकता मंच, अमळनेर तालुका व शहर यांनी केले आहे.