पाकसाठी हेरगिरी प्रकरण : मुंबईतील तिघांना एटीएसकडून अटक.

24 प्राईम न्यूज 30 May 2025

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील तिघा तरुणांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. या तिघांनी भारतातील प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) कडे पुरवल्याचा गंभीर आरोप आहे. सध्या हे तिघे पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाण्यातील एक तरुण नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून PIO च्या संपर्कात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान त्याने भारतातील संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानकडे पाठवली. या कामात त्याला दोन सहकाऱ्यांची मदत मिळाली होती.
एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे संशयितांवर नजर ठेवली होती. चौकशीदरम्यान प्राथमिक पुरावे मिळताच तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेनंतर तिघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.