शेळावे (ता. पारोळा) येथील ३३/११ KV उपकेंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी – कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे महावितरणला निवेदन..

🗞️
आबिद शेख/अमळनेर

शेळावे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे सुरू असलेले ३३/११ KV उपकेंद्राचे काम मुदत संपूनही अद्याप कार्यान्वित झालेले नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर कृषिभूषण साहेबराव पाटील (माजी आमदार, अमळनेर) यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन पाठवून तातडीने उपकेंद्र कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

साहेबराव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महावितरणच्या पाचोरा विभागाअंतर्गत रुद्रा इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनीअरींग वर्क्स, शहादा या ठेकेदाराला जास्त दराने निविदा मंजूर करण्यात आली होती. २७ जून २०२३ रोजी ९ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र ३१ मार्च २०२४ ही अंतिम मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही.
राज्यातील १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत अशा प्रलंबित कामांची तातडीने पूर्तता होण्याची अपेक्षा असताना, या उपकेंद्राचे काम रखडल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे राजवड आदर्श गावासह परिसरातील इतर गावांचा गावठाण फिडरमध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने हे उपकेंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार अमोल पाटील, तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आले आहे.