“पर्यावरण दिन नव्हे, पर्यावरण कृती वर्ष हवे!”

आबिद शेख/ अमळनेर

५ जून — पर्यावरण दिन! दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय आणि सामाजिक स्तरावर पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले गेले. भाषणे झाली, झाडे लावण्याच्या घोषणा झाल्या आणि जनजागृतीचे औपचारिक कार्यक्रम पार पडले. मात्र, या एकदिवसीय उपक्रमांमधून खरोखर किती परिणाम साधला जातो, हा खरा प्रश्न आहे.

पर्यावरण हानीचे मूळ कारण जंगलतोड, मोठ्या प्रमाणावर होत असलेली सिमेंटची बांधकामे, महामार्ग विस्तार आणि उद्योगांना अमर्याद परवाने देणे — या सर्व घटकांचा गंभीर विचार न करता केवळ वृक्षलागवडीच्या घोषणा करून उपयोग नाही.

राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी तीन कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली होती, ती अद्याप कागदावरच आहे. आता दहा कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट जाहीर झाले आहे. पण केवळ झाडं लावण्यापेक्षा ती जगवण्यावर भर दिला पाहिजे.
पर्यावरण रक्षणासाठी जनतेचा सक्रिय सहभाग, कायद्यांची कठोर अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. हे फक्त सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. भावी पिढ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता यासाठी आज प्रत्यक्ष कृती हाच एकमेव पर्याय आहे.