अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या तरुणास गुजरातमधून अटक.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालक्यातील पिंगळवाडे गावात राहणाऱ्या आणि आश्रम शाळेत सातव्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्ष ५ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे ३ जून रोजी सदर मुलगी शाळेतून गायब झाली होती. पालकांनी परिसरात शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान जानवे येथील पंकज रतीलाल पाटील (वय २३) याच्यावर मुलीच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. हेकॉ सुनील पाटील आणि पोकॉ उज्वल पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे फोन लोकेशनच्या आधारे पंकज आणि सदर मुलगी सुरतजवळील कामरेज येथे असल्याचे शोधून काढले आणि त्यांना ताब्यात घेतले.

सदर तरुणावर पोक्सो कायदा, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (एट्रॉसिटी), तसेच अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास हेकॉ सुनील पाटील करीत आहेत.