अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी अनुदान वाटपात गोंधळ; शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही थकित.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. शासनाकडून अनुदानाचे पैसे आले असूनही, तालुक्यातील तलाठी अधिकाऱ्यांनी ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न करता थांबवून ठेवले आहेत, असा गंभीर आरोप शेतकरी करीत आहे

शेतकऱ्यांनी एकत्रित जमिनीचे संमत्रीपत्र सादर केले असून, काहींनी शंभर रुपयाच्या स्टँप पेपरवर अॅफिडेव्हिटही केले आहे. तरीही कापूस आणि सोयाबीन पिकाचे हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.
कृषी सहाय्यकांकडून “साईट बंद झाली, आता काही करता येणार नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणात प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी गोंधळ केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शासनाने तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान त्वरीत मिळवून द्यावे, अशी मागणी तालुक्यातून जोर धरू लागली आहे.