अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना अद्दल घडवा – पत्रकार समाधान मैराळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..


आबिद शेख/अमळनेर
तालुक्यातील विविध नद्यांमधून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर तातडीने कारवाई करावी तसेच या प्रकरणात निष्क्रीय राहणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते समाधान मैराळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील तापी, बोरी, पांझरा या प्रमुख नद्या तसेच उपनद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. बोरी नदीत हिंगोणा गावाजवळ मोठमोठे खड्डे तयार करण्यात आले असून, जळोद, सावखेडा, मांडळ, मूडी आदी गावांमध्येही अशाच प्रकारचे वाळू उपशाचे प्रकार घडत आहेत. मात्र स्थानिक महसूल अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समाधान मैराळे यांनी नमूद केले आहे.
वाळू माफियांना स्थानिक अधिकाऱ्यांचे अघोषित समर्थन मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, अधिकारी विविध कारणांनी कारवाई टाळत असून यामुळे अवैध वाळू उपसा दिवसेंदिवस बळावत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी स्वखात्यात लक्ष घालून या प्रकरणात कठोर भूमिका घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.