सोनार समाजाच्या विवाहसंस्थेस बळकटी देणारे पाऊल. – अमळनेरात सहविचार बैठकीद्वारे नवा कृती आराखडा जाहीर.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर: सोनार समाजात वाढत्या विवाहविषयक अडचणी व घटस्फोटाचे प्रमाण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि समाजाच्या एकात्मतेसाठी सकल भारतीय सोनार समाज संघटनेच्या पुढाकाराने अमळनेर येथे एक महत्त्वपूर्ण सहविचार बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक २४ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कै. कलाबाई रामचंद्रशेट चित्ते सभागृह, मिलचाळ, श्रीराम चौक, स्टेशनरोड, अमळनेर येथे होणार आहे.
या बैठकीचे आयोजन अहिर सुवर्णकार समाज, लाड सोनार समाज आणि वैश्य सोनार समाज (अमळनेर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विवाहपूर्व व विवाहोत्तर समस्या सोडवण्यासाठी आणि घटस्फोटाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी एकूण नऊ विशेष समित्यांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे:
- प्रथम विवाह वधू-वर परिचय संकलन समिती
- पुनर्विवाह वधू-वर परिचय संकलन समिती
- दिव्यांग वधू-वर परिचय संकलन समिती
- परिचय पत्र पडताळणी समिती
- अनुरूप परिचय पत्र निवड समिती
- विवाहपूर्व समुपदेशन समिती
- विवाहोत्तर समुपदेशन समिती
- वधू-वर मेळावा आयोजन समिती
- सामुदायिक विवाह सोहळा आयोजन समिती
सुरुवातीस समिती क्रमांक १ ते ५ मधील सदस्यांची निवड केली जाणार असून, गाव, शहर आणि महानगर स्तरांवर एक पुरुष व एक महिला प्रतिनिधी नियुक्त केले जातील. एक व्यक्ती केवळ एका समितीत कार्य करू शकेल.
समिती क्रमांक ८ व ९ मध्ये विवाह आयोजन करणाऱ्या संस्थांना, सूचक मंडळांना व कार्यकर्त्यांना सदस्यत्व दिले जाणार आहे. या बैठकीत सर्व समित्यांच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा होणार असून, यामार्फत समाजाच्या विवाहसंस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अमळनेर व परिसरातील सोनार समाजबांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
आवाहनकर्ते: श्री. गोपाळ दाभाडे – अध्यक्ष, अहिर सुवर्णकार समाज श्री. दीपक मुरलीधरशेट पवार अध्यक्ष, लाड सोनार समाज श्री. संदीप भगीरथ सराफ – महासचिव, अखिल वैश्य सोनार महासंघ सौ. करुणाताई सोनार – ज्येष्ठ समुपदेशिका श्री. आनंद दुसाने – कुटुंब समुपदेशक