अजित पवारांचा हिंदी सक्तीला विरोध: “पहिली ते चौथीपर्यंत नकोच!”


25 प्राईम न्यूज 25 Jun 2025
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. “इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती नको,” अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली आहे.
या निर्णयासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेत अजित पवारांनी केलेल्या या विधानामुळे सत्ताधारी महायुतीतच वेगळ्या विचारांचे सूर उमटले आहेत. दुसरीकडे, त्रिभाषा सूत्रासंदर्भात सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर, त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी सखोल चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले आहे. यातून सरकार सर्वसमावेशक निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे, परंतु अजित पवारांच्या भूमिकेने या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.