लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार १ जुलैपासून भाडेवाढीचे संकेत.


24 प्राईम न्यूज 25 Jun 2025. -देशभरातील रेल्वे प्रवास महागण्याचे संकेत असून येत्या १ जुलै २०२५ पासून नवीन भाडेवाढ लागू होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रवाशाने १ जुलैपासून तिकिटे आरक्षित केल्यास त्याला नवीन दरांनुसार भाडे भरावे लागेल. रेल्वे प्रशासनाने ५ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये शेवटची प्रवासी भाडेवाढ केली होती. वाढता खर्च आणि देखभाल दुरुस्तीच्या ओझ्यामुळे रेल्वे प्रशासनाने भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, प्रवाशांवर भाडेवाढीचे ओझे पडू नये म्हणून ही भाडेवाढ अगदीच नाममात्र ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला आहे.नॉन-एसी मेल/एक्सप्रेस ट्रेनचे भाडे प्रति किलोमीटर १ पैशाने वाढू शकते. तर, एसी क्लासचे भाडे प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढू शकते. याचाच अर्थ एखाद्या प्रवाशाने किमान ५०० किमीचा प्रवास केल्यास नॉन-एसी तिकिटासाठी ५ रुपये जास्त आणि एसी कोचसाठी १० रुपये जास्त द्यावे लागू शकतात. परंतु, ही भाडेवाढ सर्व गाड्यांवर लागू होणार नाही. सामान्य द्वितीय श्रेणीतील ५०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ नसेल, असेही समजत आहे. याचा अर्थ कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या बहुतेक प्रवाशांना पूर्वीसारखेच भाडे द्यावे लागेल. हेच अंतर ५०० किमीपेक्षा जास्त असेल तरच प्रवाशांना प्रति किमी केवळ अर्धा पैसा भाडेवाढ सहन करावी लागेल. म्हणजेच ५०० किमीच्या प्रवासासाठी अडीच रुपये जास्त द्यावे लागतील. उपनगरीय रेल्वे आणि मासिक पासमध्ये कोणतीही भाडेवाढ नसेल.