“लालपरी” आता स्मार्ट होणार! -बस कधी येणार याची वाट बघायची गरज नाही, ‘एसटी अॅप’ वर मिळणार लाईव्ह लोकेशन…

आबिद शेख/ अमळनेर

राज्य परिवहन महामंडळाची लोकप्रिय एसटी सेवा – “लालपरी” आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी स्मार्ट होणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून ‘एसटी अॅप’ कार्यान्वित होणार असून, प्रवाशांना आपली बस कुठे आहे, कधी येणार आहे, याची माहिती थेट मोबाइलवर मिळणार आहे.
या नव्या सुविधेमुळे बसचे लाईव्ह लोकेशन, मार्ग, थांबे, आणि आगमन वेळ सहज ट्रॅक करता येणार आहे. प्रवाशांच्या तिकीटावरील ट्रीप कोडच्या आधारे बसची सटीक माहिती मोबाइलवर उपलब्ध होईल.
राज्यातील १२,००० हून अधिक बसमध्ये GPS यंत्रणा बसविण्यात आली आहे. यासाठी मुंबई सेंट्रलमधील एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात एक अद्ययावत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
ही सेवा सुरू झाल्यानंतर एसटीच्या वेळापत्रकांबाबतची अनिश्चितता संपेल आणि प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करत एसटी महामंडळ प्रवाशांना अधिक चांगली आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे.