कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या प्रयत्नाने शेतरस्ते झाले मोकळे; शेतकऱ्यांचा लोकसहभाग ठरला प्रेरणादायी!

आबिद शेख/अमळनेर

– शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग मोकळा होऊन अखेर शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 143 नुसार शेतजमिनीचा शेतीविषयक व त्यास अनुषंगिक वापर करण्याचा हक्क भूधारकांना देण्यात आला आहे. या तरतुदीच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी रस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राजवड (ता. पारोळा) येथील शेतकऱ्यांनी 7 शेतरस्त्यांची मागणी तहसीलदार, पारोळा यांच्याकडे सादर केली होती. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या पुढाकारातून महसूल प्रशासनाच्या मदतीने यातील 2 शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. या कामासाठी 20 शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सुमारे 60 ते 65 हजारांची लोकवर्गणी जमा करून सुमारे 1.5 कि.मी. लांबीचे 2 शेतरस्ते तयार केले. या रस्त्यांमुळे 35 हून अधिक शेतकऱ्यांना फायदा होऊन तब्बल 50 हेक्टर क्षेत्र मुख्य रस्त्याशी जोडण्यात आले आहे.
शासन निर्णय दिनांक 4 नोव्हेंबर 1987, 20 मे 2025 आणि 22 मे 2025 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा लोकसहभाग लक्षणीय ठरला. उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमणमुक्तीसाठी तहसीलदार मा. देवरे यांनी स्थळ पाहणी करून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या प्रेरणादायी शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या सहकार्यातून पारोळा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांमध्ये चालना मिळत असून, ही कृती इतर गावांसाठीही आदर्श ठरत आहे.