एलआयसी कॉलनीत नव्या रस्त्यानंतरही नागरिकांचे हाल; घरासमोर साचलेल्या पाण्यामुळे त्रास..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : एलआयसी कॉलनीमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले असले तरी नागरिकांच्या समस्या संपलेल्या नाहीत. रस्त्याच्या उंचसखल नियोजनातील त्रुटींमुळे अनेक घरांसमोर अजूनही पाणी साचत असून, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः पावसाळ्यात या भागात साचलेले पाणी हे डास, कीटक आणि माश्यांचे केंद्र बनत असून आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. नागरिकांच्या अंगावर पाणी उडण्याचे प्रकार, वाहतुकीतील अडथळे यामुळे संताप वाढत आहे. दोन वाहनं एकत्र गेल्यास चिखल व पाण्याचे फवारे उडतात. गोविंद चौधरी या सेवानिवृत्त शिक्षकांच्या घरासमोर तर कायम डबकं तयार राहतं, त्यामुळे त्यांना दररोजच त्रासाला सामोरे जावे लागते.
नगरपालिकेने मुख्य रस्त्यासाठी ३.२५ कोटी तर गल्लीतील रस्त्यासाठी लाखो रुपये खर्चून काम पूर्ण केलं, मात्र रस्त्यातील तांत्रिक दोषांमुळे या समस्येचे समाधान झालेले नाही. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही पालिकेने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत.
या संदर्भात मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले की, “अभियंत्यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवले जाईल. पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना लवकरच केली जाईल.”
नागरिकांची मागणी आहे की, दोषी ठेकेदारांवर कारवाई करून त्वरित दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, जेणेकरून आरोग्य धोक्यात न येता सुरक्षितता राखली जाईल.