खासदार स्मिताताई वाघ यांचा मुस्लिम समाजातर्फे गौरवपूर्ण सत्कार..

आबिद शेख/अमळनेर
– संसद रत्न पुरस्काराने सन्मानित आणि विकासकामांत पुढाकार घेणाऱ्या खासदार स्मिताताई वाघ यांचा अमळनेर शहरातील मुस्लिम समाजातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पाडळसरे धरण प्रकल्पाचा समावेश केंद्रीय योजनेत करण्यासाठी तसेच धार येथे रेल्वे गाड्यांना उरुस दरम्यान थांबा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

धार येथील प्रसिद्ध उरुसात दरवर्षी हजारो भाविक सहभागी होतात. मागील वर्षी रेल्वे थांबावाच न झाल्याने चैन पुलिंगसारखा अनुचित प्रकार घडला होता. यावर्षी अशा घटना टाळण्यासाठी, कोणतीही मागणी न येताच, स्मिताताईंनी आपल्या पदाचा प्रभावी वापर करत रेल्वे प्रशासनाकडून उरुसपुरता दोन मिनिटांचा थांबा मंजूर करून घेतला. त्यांच्या या सजग आणि तातडीच्या कृतीमुळे समाजात समाधान व्यक्त करण्यात आले.

या निमित्ताने मुस्लिम समाजातील २० ते २५ प्रतिनिधींनी त्यांचा सत्कार केला. यामध्ये सत्तार मास्टर, ॲड. शकील काझी, अखलाक भाई, जावेद अख्तर, जनाब मुस्तफा सेठ, शब्बीर सेठ, श्याम भाई (ATN), तौसिफ तेली, ठाकूर अय्याज बागवान, इस्माईल पठाण, इम्रान मेंबर, अहमद झूलेवाला, शाहिद बागवान, अदनान पठाण, आबिद सैय्यद, अब्दुला पठाण, खालिद बागवान, फैजान पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा समारोप जावेद अख्तर यांच्या प्रेरणादायी कवितेने करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार स्मिताताईंनी सांगितले की, “कोणतेही सामाजिक किंवा विकासविषयक काम घेऊन या, मी नेहमीच तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे.”