“वाढती सायबर गुन्हेगारी समाजासाठी धोकेदायक”
पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील.

0

अमळनेर ( प्रतिनिधी ) वाढती सायबर गुन्हेगारी समाजासाठी धोकेदायक असून सावधानता हेच बचावाचे मुख्य उपाय असल्याचे सुतोवाच मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन करताना काढले . क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व कै. न्हानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय,मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारवड पोलीस ठाणे येथे सायबर क्राईम या विषयावर विनोद पाटील (पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे, मारवड) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वाढती सायबर गुन्हेगारी, महिलांना येणारे निनावी फोन कॉल,रोड रोमियो द्वारा महिलांना होणारा त्रास तसेच महिलांच्या हितासाठी असलेल्या कायद्यांबाबत विद्यार्थिनींना यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येऊन विद्यार्थिनींनी विचारलेले विविध प्रश्न व शंकांचे निरसन पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले. यावेळी मारवड पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार भरत ईशी यांनी विद्यार्थिनींना एफ.आय. आर., गोपनीय विभागातील कार्य प्रणाली, मुद्देमाल कक्ष, वायरलेस यंत्रणा तसेच विविध गुन्हे व त्यांच्या कलमान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, मिसिंग फाईलच्या केसेस बाबत असे लक्षात येते की, भावनेच्या आहारी जाऊन तरुण पिढी चुकीचे निर्णय घेतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करण्याची पाळी येते म्हणून ज्या मातापित्यांनी जन्म दिला लहानाचे मोठे केले त्यांना याप्रसंगी खूप दुःख होते. म्हणून उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध असल्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील सर, ठाणे अंमलदार भरत ईशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील ,,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. नंदा कंधारे, प्रा. किशोर पाटील तसेच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनीची उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी मारवड पोलीस ठाण्यातील सर्व सहकारी पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे यशस्वी सहकार्य लाभले. विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!