जन्माला आलेल्या बाळाला स्विकारण्यास बापाचा नकार. न्यायालयाने आरोपीस बारा वर्षाची सश्रम कारावास…

0

अमळनेर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गर्भवती केले. आणि होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार देणाऱ्या धरणगाव तालुक्यातील नारणे येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नारणे येथील मूळ रहिवाशी शरद सखाराम भिल वय २४ हा चहार्डी ता चोपडा येथे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झालेले होते. मात्र पत्नी आपल्या मुलांसह माहेरी निघून गेलेली होती. म्हणून त्याने चहार्डी येथील बकऱ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीचा २०१९ ते २०२० दरम्यान रोज पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालायचा आणि तिला लग्नाचे आमिष दाखवायचा. तिच्याशी जंगलात ,पाटचारीजवळ बळजबरीने शारीरिक संबंध करत असे. अल्पवयीन मुलगी विरोध करीत असताना तिला तुझ्याशी लग्न करेल असे सांगत असे. या प्रकारातुन पीडित मुलगी गर्भवती राहिली.मात्र आरोपी शरद याने जन्माला आलेल्या बाळाला स्वीकारण्यास नकार दिला. आणि पीडित तरुणीशी लग्न करण्यासही नकार दिल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनला १९ जून २०२० रोजी पोक्सो कायदा प्रमाणे तसेच भादवि कलम ३७६ प्रमाणे बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ऍड आर बी चौधरी , ऍड किशोर बागुल यांनी पीडिता , पीडितेची आई , डॉक्टर असे एकूण नऊ साक्षीदार तपासले. न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपीला पोक्सो कायदा कलम ५ ज (२)व कलम ४ प्रमाणे प्रत्येकी बारा बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर भादवि कलम ३६३ प्रमाणे सात वर्षांची शिक्षा सुनावली. आरोपीला न्यायालयाने वकील दिला असल्याने न्यायालयाने त्याला आर्थिक दंडाची शिक्षा दिली नाही.
आरोपीने कठड्यात उभा राहून मी पीडितेशी लग्न केले असे सांगितले. मात्र न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपीने त्या जन्मलेल्या बाळाला स्वीकारण्यास नकार दिला म्हणून समाज त्या मुलाकडे अनौरस बालक म्हणून बघेल म्हणून न्याय देण्यासाठी शिक्षा सुनावली. अटकेपासून आरोपी कारागृहात होता. शिक्षा सूनावताच आरोपीला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले.
पैरवी अधिकारी म्हणून पो कॉ उदयसिंग साळुंखे , पो कॉ हिरालाल पाटील , नितीन कापडणे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!