पालखी उत्सव जलोषात साजरा.महाराष्ट्र भरातून भाविकांची हजेरी…

अमळनेर ( प्रतिनिधि ) संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थानचा पालखी मिरवणूक सोहळा बुद्ध पौर्णिमेला ५ मे रोजी उत्साहात पार पडला. सालाबादप्रमाणे भक्ती ,शक्ती आणि परंपरेचा अपूर्व संगम दिसून आला. ग्रामीण भागातील भाविकांनी ४ रोजी रात्री पासूनच बोरी नदी पात्रात गर्दी केली होती.
संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव काळातील रथ नंतर पालखी मिरवणूक महत्वाचा घटक मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून पालखी मिरवणुकीसाठी भाविक हजेरी लावत असतात. सकाळी ६ वाजेला विधिवत पूजा करून वाडी संस्थान मधून पालखी मिरवणुकीला शुभारंभ झाला.पालखीत सजावट केलेली हातात धनुष्य बाण घेतलेली मूर्ती ठेवण्यात आली होती.पालखीच्या पुढे,माऊली मित्र मंडळ, मंगळदेव संस्थान चे ढोल पथक , बालविर व्यायामशाळा ढोल पथक , प्रताप व्यायामशाळा ढोल पथक ,छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा,भुसावळ येथील रेल्वे बँड पथक , नाद ब्रम्ह ढोल पथक , यांचे आकर्षण होते. त्या पाठोपाठ मेणा ,निशाणाचे घोडेस्वार , भालदार चोपदार त्या पाठोपाठ पालखी आणि पालखीच्या मागे हभप प्रसाद महाराज अनवाणी चालत होते. सकाळपासून महिला ,पुरुष ,वृद्ध बालकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. रस्त्यात परंपरेप्रमाणे महाराज ठरल्या ठिकाणी पान सुपारीला थांबले होते. सराफ बाजार परिसरात रोटरी क्लब,राजहोळी चौक मित्र मंडळ, विक्रांत मित्र परिवार,सोनार असोसिएशन,पानखिडकी मित्र परिवार,गोपाल चौक मित्र मंडळ , राजे संभाजी मित्र मंडळ व इतर सामाजिक संस्था तर्फे थंड पेय ,कैरी पन्हे, मठ्ठा , ताक , सरबत ,पोहे खिचडीचा महाप्रसाद मोफत वाटण्यात येत होते.
वाडी चौक ,राज होळी चौक ,पानखिडकी , दगडी दरवाजा , फरशी पूल ,मारुती मंदिर ,पैलाड मार्गे बोरी नदीच्या वाळवंटातून पालखी मिरवणूक नदी पात्रातील समाधी मंदिराजवळ पोहचली. त्याठिकाणी संत प्रसाद महाराजांनी गुलालाची उधळण केली आणि ठेका धरला.अतिशय शांततेत मात्र जल्लोषात हा उत्सव पार पडला.
रखरखत्या उन्हातही संत प्रसाद महाराज व त्यांचे सहकारी अनवाणी चालत असतात. अशाही परिस्थितीत प्रसाद महाराज भक्तांना खडी साखरेचा प्रसाद देऊन भक्तीचा गोडवा आणि गारवा देत असतात. सायंकाळी महाराजांच्या पायाला अक्षरशः फोड आलेले असतात. रात्री पुन्हा ते भजन कीर्तन भक्तीत आनंदाने रंगलेले असतात.