सात्री करांनी पुतळा दहनाचे आंदोलन स्थगित..

अमळनेर (प्रतिनिधि) सात्री गावातील रस्त्यांबाबत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी मंजुरीसाठी प्रस्ताव ताप्ती पाटबंधारे विकास महा

मंडळाकडे पाठविला असून, पुढील आठवड्यात अंतिम निर्णय आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल. असे आश्वासन दिल्यानंतर सात्री येथील नागरिकांनी पुतळा दहनाचे आंदोलन स्थगित केले आहे. अमळनेर तालुक्यातील सात्री गावात पावसाळ्यात रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळत नाही आणि त्यामुळे उपचाराअभावी ३ वर्षात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पुनर्वसन व पुनरिक्षण समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी शासकीय इतमामात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच जळगाव पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात सात्री गावातील सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य अभियंता खांडेकर, उपअभियंता जितेंद्र याज्ञिक, निम्न ताप्ती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, महेंद्र बोरसे आदी उपस्थित होते.